खेलताज़ा खबरराज्य

अडथळ्यांना कौशल्याने पार करणारा : स्नेहलचा यशाचा प्रवास

मुंबई : स्नेहल मंचेकर सध्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, सीवूड्स येथे शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका आहेत. पण त्या केवळ सामान्य शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका नाहीत. स्नेहलचे फुटबॉल कौशल्य आणि प्रतिभा DBS बँक, Nike’s Da Da Ding गाणे, Phone Pe anthem आणि BYJU’ सारख्या नामांकित संस्थांच्या जाहिरातींमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यांनी फिफा U17 महिला अल्बम लाँचसाठी देखील परफॉर्म केले. परंतु आयुष्य त्यांच्यासाठी इतके सहज नव्हते. स्नेहल नवी मुंबईत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या आहेत. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.

त्यांच्या वडिलांची खाजगी नोकरी होती आणि ते एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होते. असे असूनही, स्नेहलचा नेहमीच क्रीडा व्यावसायिक बनण्याकडे कल होता. शालेय शिक्षणादरम्यान त्या त्यांच्या वरिष्ठांना शाळेच्या तळघरात विविध खेळ खेळताना दिसायच्या. त्यांना वेगवेगळे खेळ खेळण्याचा इतका उत्साह होता की, त्यांनी त्यांच्या आईला शाळेच्या अधिका-यांशी बोलून त्यांना खेळण्याची परवानगी मिळवून देण्यास मनवले.

जेव्हा त्या दहावीत होत्या, तेव्हा त्यांची फुटबॉल आणि त्यांचे प्रशिक्षक हेमंत यांच्याशी ओळख झाली. ते स्नेहलच्या धावण्याने खरोखर प्रभावित झाले आणि स्नेहलला शाळेतील मुलींच्या फुटबॉल संघात सामील करण्यचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना खेळाकडे अधिक सातत्याने आणि समर्पणाने बघण्याचे प्रोत्साहन मिळाले. फुटबॉलमधील त्यांची गती पाहून त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना ग्रीन रॉक या क्लबमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले.

नंतर त्यांनी इंडिया कल्चर लीगच्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कॉलेजचा मुलींसाठीचा पहिला फुटबॉल संघ तयार केला. संघ स्वतःच सराव करत असे, कारण ते अगदी नवीन होते आणि कॉलेजकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी निधी किंवा सुविधा नव्हत्या. पण, त्यांच्या पहिल्याच आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत त्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश आले. जरी ते पराभूत झाले असले, तरी त्यांनी कठोर सराव केला आणि त्यांच्या पुढील खेळामध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. यामुळे स्नेहलसाठी या क्षेत्रात आणखी अनेक मार्ग खुले झाले, कारण त्यांची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आणि नंतर त्या मुंबई विद्यापीठ संघात सामील झाल्या.

पण जेव्हा त्या सामने जिंकून महिला फुटबॉलच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करत होत्या, तेव्हा दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि ती अधिकच कठीण होत होती. स्नेहलसाठी तो एक आव्हानात्मक काळ होता कारण त्यांना एकाच वेळी काम, खेळ आणि अभ्यास सांभाळायचे होते. त्यांच्या प्रशिक्षकाच्या मदतीने त्यांना सेंट ऑगस्टीन हायस्कूलमध्ये दिवस पाळीची नोकरी मिळाली. त्या सकाळी ७ ते संध्याकाळी ४ पर्यंत काम करायच्या आणि नंतर त्यांच्या खेळात सुधारणा करण्यासाठी आणि फुटबॉल कौशल्य सुधारण्यासाठी काही तास सराव करायच्या. त्यांची लवकरच ज्युनियर आणि सीनियर राष्ट्रीय संघांसाठी निवड झाली. परंतु या स्पर्धांमधील सहभागामुळे आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे स्नेहल त्यांच्या कामाच्या ठिकाणी नियमित राहू शकल्या नाहीत आणि नंतर बराच काळ गैरहजर राहिल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले.

यामुळे खचून न जाता त्यांनी ही संधी म्हणून घेतली. स्नेहलने कमाईच्या मागे धावण्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या निर्णयांना अभिमानाने पाठिंबा दिला आणि लवकरच त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये खेळायला मिळाले. त्यांच्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर, स्नेहल फ्रीस्टाईल प्रकाराने प्रेरित झाल्या आणि त्यांनी त्याबद्दल अधिक शिकण्यास सुरुवात करत आपली कौशल्ये सुधारली. यामुळे लोक त्यांना ओळखायला लागले आणि त्यांना अनेक नामांकित संस्थांकडून जाहिरातींच्या ऑफर मिळाल्या. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आणि त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू शकल्या.

त्यांच्या वरिष्ठांनीही त्यांच्या नावाचा फुटबॉल रेफ्री म्हणून विचार करण्याविषयी सुचवले. शिकत असतानाच त्यांना नॅशनल इन्क्लुजन कपसारख्या स्पर्धेत खेळण्याची संधीही मिळाली. मेक्सिकोमध्ये झालेल्या होमलेस विश्वचषक स्पर्धेतही त्या खेळल्या आणि कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व केले. त्यांनी इंग्लंडला हरवून ही स्पर्धा जिंकली.

स्नेहल सध्या पनवेल येथील महात्मा कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षणात पदवीचे शिक्षण घेत आहेत. रेफरी म्हणूनही ती त्यांची कारकीर्द सुरू आहे. नॅशनल रेफ्री होण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. त्यांनी अनेक अडथळे पार केले आहेत, त्यांनी विश्वास आहे की त्या वाटेत येणारा कोणताही अडथळा दूर करू शकतात. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना स्नेहल म्हणतात, “माझा प्रवास हा या खेळाविषयीच्या माझ्या आवडीचे द्योतक आहे. मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, माझ्या कुटुंबाला पाठिंबा देऊ शकते. त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »